hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

‘द ग्रेट इंडिया पॉलिटिकल लीग’ चा विजेता ‘भाजप’च

चार राज्यांतील चार धुरंधर

अजित हरेश पाटील प्रमुख संपादक

अत्यंत उत्सुकतेचा विषय असलेल्या तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम या चार राज्ये व पुद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल अखेर लागले. या निवडणुकीत एकूण २९६ जागा जिंकून भाजपच या ‘द ग्रेट इंडिया पॉलिटिकल लीग’ चा अंतिम विजेता ठरला. 

नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा हा मोठा विजय आहे यात शंका नाही. तरीसुद्धा चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक नेत्यांचा करिश्मा नजरेआड करून चालणार नाही. पहिले उदाहरण म्हणजे सुवेंदू अधिकारी.

ममता बॅनर्जी यांचे कट्टर समर्थक असलेले सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय प्रवासाला काँग्रेस पक्षाकडून सुरुवात केली. त्यांचे वडील मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री होते. अधिकारी यांनी काँग्रेस सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला. ते वाहतूक मंत्री होते. २०२० साली त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्याने भाजप मध्ये प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकांत त्यांनी ममता यांचा पराभव केला होता पण तृणमूल काँग्रेसने सरकार वाचवले. याहीवेळी त्यांनी ममता यांचा त्यांच्या गड असलेल्या भवानीपुर मतदार संघात पराभव केला आहे व तृणमूल काँग्रेसचाही सफाया केला आहे.  २१५ वरून तृणमूल काँग्रेसला ८१ वर आणण्यात व भाजपला ७७ वरून २०६ वर नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. २०२१ ला प्रशांत किशोर यांनी ममता यांना वाचवले होते. यावेळी त्यांनीही ममता यांची साथ सोडली होती. याचे कारण कोणता घोडा रेसमध्ये जिंकण्याची शक्यता आहे याचे ज्ञान प्रशांत किशोर यांना आहे.

दुसरे उदाहरण थलपती विजय यांचे. हे दुसरे धुरंधर. ५१ वर्षीय विजय हे मुळात अभिनेता. अभिनय क्षेत्र सोडून त्यांनी अवघ्या दोन वर्षापूर्वी टीव्हींके म्हणजेच तमिलगा वेट्री कझगम या पक्षाची स्थापना केली. अनेक वर्ष आपली पाळेमुळे तामिळनाडूत घट्ट रोवलेल्या द्रमुक व अण्णा द्रमुक या पक्षांना हरवणे सोपे नव्हते. जयललिता यांच्या निधनाने द्रमुक कमजोर झाला होता व स्टालिन यांच्या केंद्र सरकारशी संघर्षाने राज्याला नुकसान होत होते. त्यात विजय यांचा व्यक्तिगत करिश्मा व प्रचार करण्याची आधुनिक पद्धत लोकांना भावली.

थ्री डी लेझर होलोग्रम भाषणे, प्रचार सभांत चक्क डूप्लीकेटसचा वापर, लोकांना पक्षाचे चिन्ह असलेल्या शिटीचे वाटप, सफेद शर्ट व खाकी पँट ला आपला युनिफॉर्म बनवणे व प्रचार सभांचा धडाका यामुळे २३४ पैकी १०७ जागा जिंकून विजय यांनी चमत्कार घडवला आहे. आता त्यांना बहुमतासाठी केवळ ११ जागा हव्या असून त्या काँग्रेस व इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सहज मिळू शकतात. विजय यांच्या रूपाने एक ख्रिस्ती धर्माचा मुख्यमंत्री प्रथमच तमिळनाडूत सत्ता सांभाळेल असे दिसते.

 

तिसरे धुरंधर म्हणजे हिमंता विश्व शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री. इतर राज्यात सत्तविरोधी लाट असताना आसाममध्यें ८२ जागा भाजपला मिळवून देण्यात मुख्यमंत्री हिमंता यशस्वी ठरले. २०२१ च्या तुलनेत २२ जागा अधिक. काँग्रेसच्या दहा जागा त्यांनी कमी केल्या मात्र यावेळी बोडो फ्रंट ने प्रथमच राज्यात आपले खाते उघडत दहा जागा मिळवल्या आहेत.

हिमंता आता योगी आदित्यनाथ व देवेंद्र फडणवीस यांच्या रांगेत आले आहेत असे म्हणू शकतो. मात्र ते मूळचे काँग्रेसचे आहेत ही समस्या आहे. २०१५ साली त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर असंतोष व्यक्त करून भाजपमध्ये प्रवेश केला व गेल्या ११ वर्षात ते भाजपमध्ये चांगलेच रुळले आहेत. एवढे की योगीनंतर भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांचेच नाव पुढे येते. याबाबतीत ते देवेंद्र फडणवीस यांना मागे सारतात. भाजपच्या भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील एक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा समावेश करायला हरकत नाही.

 व्ही डी सतिशन या चौथ्या धुरंधराचे नाव तुम्ही ऐकलेही नसेल. हे पेशाने वकील होते. राजकारण काँग्रेस पक्षात प्रवेश करून सुरू केले मात्र डाव्या पक्षांचा गड असलेल्या केरळम मध्ये सुरुवातीला त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या ते केरळममध्ये विरोधी पक्षनेता व काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेता आहेत. राज्यात काँग्रेस नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीची मोट बांधण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व गेल्या वेळच्या तुलनेत तिप्पट जागा पक्षाला मिळवून दिल्या. २०२१ ला  २२ जागा मिळवणारा काँग्रेस यावेळी ६३ जागा जिंकला आहे. केरळमचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव निश्चित मानले जाते.

या निकालातून काय निष्कर्ष काढायचे तर ते खालील प्रमाणे

१ जनतेने सर्व पक्षांना दाखवून दिले आहे की सत्ता म्हणजे जहागिरी नाही. जनतेला बदल हवा असेल तर सत्ताधारी पक्ष कितीही लोकप्रिय असो व कितीही आश्वासने देवो जनता बदल घडवणारच.

२ सवंग लोकप्रिय घोषणा व मोफत सर्व काही देण्याची आश्वासने यांना आता थारा नाही. याचे कारण सर्वच पक्ष जनतेला मोफत व कमी दरात सेवा, अन्नधान्य देण्याची व आर्थिक मदत देण्याची घोषणा करत आहेत त्यात डावे उजवे करायची सोय राहिलेली नाही.

३ तरुण राजकारण्यांना जनता अधिक पसंत करत आहे. थलपती विजय, हिमंता विश्व शर्मा, सुवेंदु अधिकारी राजकीयदृष्ट्या तरुण आहेत त्यामुळे पुढील निवडणुकांत राजकीय पक्षांनी तरुण चेहरे पुढे आणले पाहिजेत.

४ २०२७ साली सात राज्यांत निवडणुका होत आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब व मणिपूर. यातील पाच राज्यांत म्हणजे गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा व मणिपूर मध्ये भाजपची सरकारे आहेत म्हणजे त्यांना होम पीचवर खेळण्याचा फायदा मिळणार आहे. हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस व पंजाब मध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आहे. निवडणुकांपूर्वी राघव चढ्ढा यांच्या रूपाने पंजाबमध्ये भगवंत सिंग मान यांना प्रतिस्पर्धी निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल व हिमाचल प्रदेश मध्ये सुखविंदर सिंग सुक्खु यांना थेट आवाहन देवून पुन्हा राज्य काबीज करून सात पैकी सात राज्ये ताब्यात मिळवण्याची तयारी भाजपने आताच सुरू केली आहे.

ममता व स्टालिन यांच्या पराभवाने व उद्धव आणि शरद पवार यांच्या अर्ध निवृत्तीने खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला जर राज्यातील एक राज्य जरी मिळवता आले तर तो भाजपपेक्षाही मोठा विजय मानावा लागेल.

ईमेल – ajitpatil00747@gmail.com

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button