अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेल विजयी
सर्व उमेदवारांचा विजय; चित्रकर्मी पॅनेल पराभूत

नुकत्याच संपन्न झालेल्या व कमालीच्या वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचा विजय झाला असून त्यांचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या समर्थ पॅनेलमध्ये 16 उमेदवार होते. ज्यामध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काजी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. हे सर्व १४ उमेदवार समर्थ पॅनेलमधून विजयी झाले आहेत.

एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक झाली होती त्यातील तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक आनंद शिंदे व विजय खोचीकर यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती.

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल व सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेल यांच्यात चुरस रंगेल अशी अपेक्षा होती.

मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक व सोलापूर केंद्रांवर मतदान पार पडले, मराठी चित्रपट सृष्टीतील तारे तारकांनी या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सहभाग घेतला नाही. मात्र तंत्रज्ञ व पडद्यामागच्या कलाकारांनी उत्साहाने भाग घेतला.