hi Hindi en English mr Marathi ur Urdu
ताज्या बातम्या

गिरीश महादेव जोशी

लिम्का बुक मध्ये नोंद झालेला मराठी अभिनेता

श्रीमान श्रीमती मालिकेतील विनोदी पोलीस निरीक्षक असो अथवा झाली मुंबई सोन्याची मधला परश्या भाईचा गुंड असो कोणतीही भूमिका मन लावून करत त्याचे सोने करण्याची ताकद गिरीश महादेव जोशी या अष्टपैलू अभिनेत्याकडे आहे.

पुण्यात जन्मलेले पण मुंबईत दादर येथे वाढलेले, रुपारेल या प्रसिध्द कॉलेजचे विद्यार्थी गिरीश जोशी यांनी अभिनयाची सुरुवात सुधा करमरकर यांच्या लिट्ल थिएटर पासून केली. त्यांची मावशी अभिनय क्षेत्रात असल्याने लहानपणापासून अभिनय त्यांच्यासाठी नवखा नव्हता.त्यांची अभिनय सुरुवात ही रंगभूमीवरच झाली. ‘ती वेळच तशी होती’ हे सुरेश खरे यांनी लिहिलेले नाटक हे त्यांचे पहिले नाटक. या नाटकात रीमा लागू, जान्हवी पणशीकर, भारती आचरेकर यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्री बरोबर त्यांना काम करायची संधी त्यांना लाभली.

रंगभूमीवर सतत काम केल्याने मराठी चित्रसृष्टीतील राजन वाघधरे, महेश मांजरेकर यांच्यासारख्या रत्नपारखी लोकांच्या नजरेत त्यांचे उमदे व्यक्तिमत्त्व भरले. सुमारे सहा फूट उंची, दरारा वाटेल असा चेहरा व भेदक डोळे अशा व्यक्तिमत्त्वाने त्यांना दामिनी ही मराठी व श्रीमान श्रीमती या हिंदी मालिकेत पोलीस निरीक्षक म्हणून भूमिका मिळाली. विशेषतः श्रीमान श्रीमती मालिकेतील विनोदी पोलीस निरीक्षक भूमिकेमुळे देशभर त्यांना ओळख मिळाली.

या दोन्ही मालिकांचे मिळून १२०० एपिसोड मध्ये पोलीस निरीक्षक भूमिका रंगवल्याबद्दल गिरीश जोशी यांची चक्क लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद आहे.त्यांनी केवळ विनोदी भूमिका केल्या नाहीत तर खलनायकी भूमिकाही केल्या. ‘झाली मुंबई सोन्याची लालबाग परळ’ या महेश मांजरेकर यांच्या मराठी व ‘सिटी ऑफ गोल्ड’ या हिंदी चित्रपटात पर्श्या भाईचा गुंड ही त्यांची भूमिकाही गाजली. सिटी ऑफ गोल्ड मुळे पूर्ण देशभर त्यांना लोक ओळखू लागले.

आज गिरीश जोशी चित्रपट व मालिकेत काम करण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय ही करतात. अशा चतुरस्र कलाकार व उमद्या स्वभावाच्या माणसाला आगामी वाटचालीसाठी सुप्रभात तर्फे शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button