भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी टूर सर्किटचे आयोजन
पर्यटन विभागाचा कौतुकास्पद उपक्रम

अनुज केसरकर शिवस्वराज्य न्यूज
मुंबई, दि. १० एप्रिल, २०२६* :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी सदर सहल निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार सगळ्या स्तरांतील पर्यटक तसेच नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या टूर सर्कीट सहलीचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बि.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तसेच नागपूर येथील दिक्षाभूमी, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस या स्थळांचा समावेश आहे. दि. १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता टूर सर्कीट सहलीला सुरुवात होईल. मुंबईतील टूर सर्कीट सहलीची सुरुवात चैत्यभूमी, दादर येथून होणार आहे. तर नाशिकमधील गडकरी चौक आणि नागपूरमधील दिक्षाभूमी येथून टूर सर्कीट सहलीला सुरुवात होईल.
सदर सहली अंतर्गत दररोज विशेष बसेस सोडण्यात येतील. दरम्यान प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर बसमध्ये प्रवेश उपलब्ध करुन देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन विभागाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन विभागाने सदर सहलीचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी ही सहल महत्त्वपूर्ण ठरेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे औपचारिक उद्घाटन दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
*शंभुराज देसाई, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र शासन*
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींनी पावन झालेल्या मुंबई, नाशिक आणि नागपूरमधील स्थळांना भेट देणे, हा केवळ एक प्रवास नसून त्यांचा समृद्ध वारसा जवळून अनुभवायची सुवर्ण संधी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि त्यांचे विचार प्रत्येक घराघरात आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच या उपक्रमामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळेल. पर्यटक, नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आम्ही आवाहन करतो.”
*संजय खंदारे (भा.प्र.से) प्रधान सचिव, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन*
“चैत्यभूमी, मुक्तीभूमी, दिक्षाभूमी सारखी ठिकाणे फक्त धार्मिक स्थळे नसून या ठिकाणांना सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व आहे. टूर सर्कीट सहल या उपक्रमाद्वारे समतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. नव्या पिढीला सदर टूर सर्कीट सहलीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान, त्यांचे विचार जवळून अनुभवता येतील. या उपक्रमामध्ये अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे.”
*डॉ. बी.एन.पाटील, (भा.प्र.से.) संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन*
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. हेच लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचा उपक्रम पर्यटन विभागाने हाती घेतला आहे. यासाठी पर्यटन विभागाने सखोल नियोजन केले आहे. या टूर सर्कीट सहलीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, त्यांचे कार्य व विचार समजून घेण्यास पर्यटकांना मदत होईल.”
*टूर सर्किटची वैशिष्ट्ये*
*आयोजनाची ठिकाणे* – मुंबई , नाशिक आणि नागपूर
*कालावधी* – दि. 13 व 14 एप्रिल, 2026
*सुविधा* – प्रत्येक शहरात दोन बसेसद्वारे सहल, टूर मार्गदर्शक, अल्पोपहार, पिण्याचे पाणी
*सहलीसाठी संपर्क –*
*मुंबईसाठी संपर्क* – पवन पवार : 7666603211, सूरज चतुर्वैदी : 8108175530
*नाशिकसाठी संपर्क* – तुषार शिंदे : 9890255157, ऋषिकेश चव्हाण : 8806841468
*नागपूरसाठी संपर्क* – अविनाश गजघाटे : 9823111203