अढळ व आंधळी श्रद्धा समाजाला अंधश्रद्ध बनवते
प्रा. श्याम मानव यांचे 'बुवा तेथे बाया' व्याख्यानात प्रतिपादन

विनायक बिले शिवस्वराज्य न्यूज
श्रद्धा चिकीत्सक व लवचिक असावी. अढळ व आंधळी श्रद्धा समाजाला अंधश्रद्ध बनवते असे स्पष्ट प्रतिपादन प्रा. श्याम मानव यांनी १२ मे २०२६ रोजी दादर येथे राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित ‘बुवा तेथे बाया : भोंदू बाबाला स्त्रिया का फसतात?’ या विषयावरील व्याख्यानात केले.
सध्याचे राज्यकर्तेच बुवा व बाबांच्या नादाला लागले असल्याने अशोक खरात सारखी प्रकरणे घडत असल्याचा गंभीर आरोप करत श्याम मानव यांनी सुशिक्षित स्त्रिया बाबा बुवांच्या नादी का लागतात यामागचे रहस्य उलगडून सांगितले. दैवी अवतार किंवा दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा प्रत्येक बाबा बुवा ढोंगीच असतो असे ठासून सांगत जादूटोणाविरोधी कायदा व मॅजिक रेमेडिज व ड्रग कायदा कठोर असूनही महाराष्ट्रात अशी भोंदू बाबांकडून स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे घडणे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भीती, आर्थिक फायदा, मोक्ष व दैवी कृपा अशा बहाण्याने भोंदू बुवा स्त्रियांचे लैंगिक शोषण व आर्थिक शोषण करतात. नाहीतर दैवी अवकृपेची व घरातील सदस्याच्या मृत्यूची भीती घालतात. यामुळे कुटुंबासाठी त्याग करतोय या भावनेपोटी स्त्रिया लैंगिक व आर्थिक शोषण याविरुद्ध तक्रार करत नाहीत ही वस्तुस्थिती स्पष्ट करत प्रा. श्याम मानव यांनी अनेक ढोंगी बाबांचे दाखले दिले.
केडगावकर महाराज, गुलाबदास महाराज, शुकदास महाराज, हल्लीचे बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण महाराज, राम रहीम, आसाराम बापू, कृपाळू महाराज यांचे अनेक किस्से यावेळी प्रा. श्याम मानव यांनी सांगितले. राजकीय व्यक्ती विशेषतः सत्तापदी असलेले राजकारणी या बाबांचे भक्त असल्याने पोलीस व कायदा आपले काही वाकडे करू शकणार नाही अशी गुर्मी या बाबांमध्ये असते. या बाबा बुवांसाठी आपले राजकीय वजन वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्धही कारवाई झाली पाहिजे असेही मानव पुढे म्हणाले.
महाराष्ट्रात गेली काही वर्षे राज्यकर्तेच बाबा बुवांना घेवून राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या चरणावर डोके ठेवत आहेत अशा वेळी कायदा असूनही पोलीस अशा बाबाविरुद्ध कारवाई करायला धजत नाही. पूर्वी वर्तमानपत्रात भोंदू बाबाकडून होत असलेल्या लैंगिक शोषणाची बातमी जरी आली तरी पोलीस त्वरित कारवाई करत मात्र आता तसे होताना क्वचितच दिसते असेही ते म्हणाले.
यावेळी व्याख्यानाला प्रमुख उपस्थिती सुधाकर सुराडकर माजी पोलीस महानिरीक्षक व अनिस चे मुंबई विभाग अध्यक्ष मधुकर कांबळे माजी सहाय्यक आयुक्त मुंबई महानगर पालिका अनिस राष्ट्रीय अध्यक्ष, सुरेश झुर्मुरे कार्याध्यक्ष अनिस रवी खानविलकर, अजित पाटील, विकास झाडे, गीता ढोमे, प्रवीण अंकितकर, समाजसेवक दत्ता यादव पत्रकार रवींद्र गावडे तसेच अनिसचे अनेक कार्यकर्ते व श्रोते उपस्थित होते.