hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजन

नाटककार राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांची आज जयंती

'महाराष्ट्राच्या शेक्सपियर' ला सादर अभिवादन !

२६ मे हा ‘महाराष्ट्राचे शेक्सपियर ‘ मानले गेलेल्या राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांचा  जयंती दीन. याच दिवशी १८८५ साली गुजरातेत (तेव्हाची बॉम्बे प्रेसिडेन्सी) नवसारी येथे राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला.

राम गणेश गडकरी यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचे वडील निधन पावले व सीकेपी समाजात जन्मलेल्या गडकरी यांच्यामागे दारिद्र्याचे शुक्लकाष्ठ लागले. त्यांचा जन्म गुजरातेत झाला असल्याने वयाच्या ९ व्या वर्षापर्यंत त्यांना चांगले मराठी येत नव्हते. मात्र पुढे महाराष्ट्रात शाळेत व महाविद्यालयात त्यांनी मराठी व संस्कृतचा जोरदार अभ्यास केला. सोबत इंग्रजी भाषेतील नाटके वाचून काढली. संत कवी व तत्कालीन कविंच्या साहित्याच्या अभ्यासामुळे पुढे एक महान नाटककार व कवी बनण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला.

अवघ्या ३५ वर्षाचे आयुष्य गडकरी यांना लाभले. तरीही त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. चार नाटके, १५० कविता, अनेक विनोदी लेख, प्रहसने त्यांनी लिहिली. त्यांची तीन नाटके त्यांच्या अकस्मात निधनाने अप्रकाशित राहिली. राजसंन्यास, गर्वनिर्वाण, वेड्यांचा बाजार ही ती नाटके.  गोविंदाग्रज या नावाने त्यांनी कविता लेखन केले. वागवैजयंती व पिंपळपान हे त्यांचे कवितासंग्रह खूप गाजले. बाळकराम व सवाई नाटकी या नावाने त्यांनी काही विनोदी लेखन व प्रहसनेही लिहिली.

प्रसिद्ध नाटककार दिवंगत विजय तेंडुलकर यांच्या मते गडकरी भारतीय भाषांतील नाटककारांत कालिदास यांच्यानंतरचे श्रेष्ठ नाटककार होते. आचार्य अत्रे यांनी तर म्हटले की गेल्या दहा हजार वर्षात राम गणेश गडकरी यांच्याइतका महान नाटककार झाला नाही.

गडकरी यांचे वैवाहिक आयुष्य सुखाचे नव्हते. त्यांचे दोन विवाह झाले व दोन्ही विवाह फारसे सुखकारक नव्हते. लहान भाऊ गोविंद व वडिलांचा मृत्यू त्यांनी त्यांच्या लहानपणीच अनुभवला पण वैयक्तिक दुःखाची पुसटशी छाया  त्यांच्या साहित्यावर पडलेली दिसत नाही उलट विनोदी लेखन करताना त्यांची शब्दप्रतिभा व कोट्या करण्याचा सहज स्वभाव उफाळून वर यायचा.

शब्दांचे उलटसुलट खेळ करून साहित्यात वेगळा दर्जा निर्माण करणाऱ्या राम गणेश गडकरी यांना नागपूर येथील सावनेर गावात मृत्यू यावा हा विलक्षण योगायोग. नवसारी येथे जन्म व तीच अक्षरे असलेल्या सावनेर येथे दिनांक २३ जानेवारी १९१९ रोजी मृत्यू. आज त्यांच्या स्मृतीचे अभिवादन व जतन करणारी वास्तू ठाण्यात गडकरी रंगायतनच्या रूपाने उभी आहे.

महाराष्ट्राच्या या शेक्सपियर ला मानाचा मुजरा !

रवींद्र मधुकर

शिवस्वराज्य न्यूजसाठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button