चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकारण्यांची उडी
विजय पाटकर आणि मेघराज भोसले यांच्यात वादावादी तर सुशांत शेलार यांची सुषमा अंधारेवर टीका

चित्रपट व नाट्य प्रतिनिधी
७ जून २०२६ रोजी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीआधीच वातावरण तापू लागले असून काही राजकीय पक्षातील नेत्यांच्या जवळच्या लोकांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने आरोप प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे.
प्रसिद्ध मराठी व हिंदीतील अभिनेते आणि महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर व सध्याचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. विजय पाटकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आरोप केला की काही मंडळींनी राजकारण करून त्यांना यावेळच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू दिला नाही. ते पुढे असेही म्हणाले की पाच वर्षे महामंडळ बंद होते. एक वर्ष प्रशासक नेमला गेला व सात महिन्यानंतर महामंडळाच्या कामगारांना पगार मिळाला आहे. या दुरावस्थेस जबाबदार कोण आहे ? त्यांनी असाही आरोप केला की एका मंत्र्याच्या ओएसडी द्वारे कोल्हापुरात ठाण मांडून व राजकीय दबावाचा वापर करून ही निवडणूक मॅनेज केली जात आहे.
तर दुसरीकडे विजय पाटकर यांनी ज्यांच्यावर निशाणा साधला त्या वर्तमान अध्यक्ष मेघराज भोसले यांनी पाटकर यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. विजय पाटकर मराठी चित्रपट सृष्टीवर कलंक असल्याचे सांगून ते म्हणाले की गेली तीस वर्षे ते चित्रपट उद्योगात आहेत. त्यानंतर त्यांना या महामंडळाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. विजय पाटकर यांनी त्यांच्या एका वर्षाच्या अध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत स्वतःसाठी पाच चित्रपट मिळवले एवढेच काम केले अनुदान देतो असे सांगून अनेक निर्मात्यांना फसवले व प्रचंड भ्रष्टाचार केला असे गंभीर आरोप मेघराज भोसले यांनी केले. विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून कोणी रोखलेले नाही. ६० लोकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांना कोणी रोखले नाही मग एकट्या पाटकर यांना कसे रोखता येईल. भ्रष्टाचार केल्यानेच पाटकर निवडणूक लढवत नाहीत असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून असा आरोप केला आहे की सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची पत्नी व अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांच्या निवडणुकीतील विजयासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावली जात आहे जे अनुचित आहे.
त्याला शिवसेना शिंदे गटाचे सचिव व अभिनेता, निर्माता सुशांत शेलार यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नीलम शिर्के गेली ३५ वर्षे मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीत आहेत. त्यांना जर महामंडळाची निवडणूक लढवावी असे वाटले तर त्यात गैर काय असा सवाल सुषमा अंधारे यांना केला आहे. सुषमा अंधारे यांनी अभिनेत्री व्हावे व महामंडळाची निवडणूक लढवावी असा टोलाही त्यांनी हाणला.
सुशांत शेलार यांनी विजय पाटकर यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला. पाटकर यांनी ‘मानाचा मुजरा ‘ या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सुमारे ५७ लाखांचा खर्च मंजूर केला. हा कार्यक्रम केवळ १० ते १५ लाखांत करता आला असता. न्यायालयानेही याबाबत कोरडे ओढले असल्याचे ते म्हणाले.
७ जून रोजी महामंडळाची निवडणूक कोल्हापूर, पुणे व मुंबई येथील केंद्रांवर महामंडळाची निवडणूक होत असून १७ जागांसाठी ६० उमेदवारांनी अर्ज केले असून यात अनेक दिग्गज कलाकारांच्या अर्जामुळे रंगत आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर २९ मे रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल.
शिवस्वराज्य वृत्तसेवा
या बातमी संदर्भातील व्हिडिओज पहा