hi Hindi en English mr Marathi ur Urdu
जीवनशैली

あ बयनामा : अस्सल ग्रामीण वास्तवाचे भेदक चित्रण あ

प्रथितयश लेखक बा.बा. कोटंबे यांचा कथासंग्रह

बयनामा : अस्सल ग्रामीण वास्तवाचे भेदक चित्रण

प्रथितयश कथा कादंबरीकार बा.बा. कोटंबे यांचा बयनामा हा कथासंग्रह उत्तम, आशयसंपन्न व समृद्ध कथासंग्रह आहे.

मराठवाड्यातील बोली शैलीने ही कथा ही समृद्ध आहे.या कथासंग्रहात समकालीन वास्तवाचे अतिशय विदारक चित्रण आले आहे. बयनामा या कथासंग्रहात सोळा कथा आहेत. या कथांमध्ये ग्रामीण वास्तवाचे भेदक चित्रण आहे. माणसं कशी गिरगुट झाली आहेत. रंग बदलणारी, माणुसकीला काळीमा फासणारी माणसं यात आहेत तशी चांगलीही माणसे आहेत. ‘आडकाठी’ या कथेत नायकाला बहिणीचं लग्न उरकायच आहे.. घरात, शेतात वाटणी मागणारे भाऊ हे बापाशी भांडत आहेत. लहान बहिण शेतात जीव द्यायला आली आहे. नेमकं त्याचं दिवशी झाडाखाली झोपलेला तिचा भाऊ ते पाहतो. कांता शेतात आली आहे. एका दगडाखाली तिने चिठ्ठी लपवली. भाऊ ती चिठ्ठी वाचतो. माझ्यामुळे घरात आडकाठी झाली. त्यामुळं मी जीव देत आहे. पण भाऊ तसं होऊ देतं नाही. आता आई वडील आणि माझा संसार करून मी बहिणींचं लग्न करीन असे ठरवून तो बहिणीने जी दोरी गळफास घ्यायला आणली होती. त्याचं दोरीनं कडबा बांधून बहिणीला पुढं घालून घरी घेऊन येतो.
‘पेच’या कथेतील नायक रघू.त्याची यमान घेतलेली फिरकी. तू बाय‌को पोरांना घरच्यांना फसवले आहे. तूझे पाप वाढले तूला घेऊन जायला आलोय. रघूचं लफड आहे. ही अफवा गांवभर पसरते. आता शेती पोराच्या नावाने करून दिली पाहिजे. अन् नेमके तसे होते. पण गावभर बोंब आणि रघूचा अपमान हा पेच अतिशय उत्तम लेखकाने दाखवला आहे.
‘चौकडी’ या कथेत आजच्या परिस्थितीचे मनस्वी दर्शन आपल्याला होते.’शेतीचा धंदा आतबट्याचा आहे. शेती मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. असे गावांत पारावर भाषण ठोकायला नेते येतात. मानधन घेतात व निघुन जातात. पण प्रत्येक विचारपिठावर सत्यवादी बोलायचं अन् कृती मात्र अतिशय वाईट. अशी ही ‘चौकडी’कथा
कुसूम ही हळूवार प्रेमाची कहाणी आहे. प्रेम हे एक व्याकुळ रसायन आहे. पण प्रारब्धाच्या पुढे काहीच चालत नाही. या कथेतील नायिका आणि प्रियकर यांचे लग्न होतं नाही पण एका अधुऱ्या प्रेमाची ही ग्रामीण कथा मनातले कातरं भाव व्याकुळ करुन जातात. ‘सावली’ रोहिदास कथेचा नायक. घरात कुणीचं नाही. भाकरी करून घालायला कोणी नाही. म्हणून शेजारच्या विधवा द्वारकानं रोहिदासला मदत केली. पोरगी कुणीही देईल. मामा बहिणीचा विरोध असताना एका विधवा द्वारकाबरोबर तो मंदिरात जाऊन माळ घालतो. ती त्याच्या संसाराची त्याची सावली होऊन जाते. ही आशय संपन्न कथा म्हणजे आज विधवा स्त्रीशी कुणी विवाह करीत नाही. तिचा गैरफायदा घेतात. बुजगावणं कथेत पंढरी सरपंच झाल्यापासून नुस्त्या झमिल्या. नुसत्या कटकटी, नवरा बायकोचे सतत भांडण या साऱ्या कटकटीचा राजीनामा देऊन सरपंच म्हणजे नुस्त बुजगावणं व्हायला पंढरी नकार देतो. पंढरी शेतात जाऊन गड्याबरोबर निवांत जेवतो. “खरं म्हणतूस, चल मग, सोड भाकरी. आता मी ही जेवतो तुझ्या बरोबर. डोक्यावरचं वझ गेलं बघ असे त्याला बोलतो.
‘पट्टी’ कथेत पट्टी दौलतरावच्या नावानं करु दिली होती त्याच शेताच्या बांधावर विठ्ठलरावांन आंब्याच्या फांदीला फाशी घेतली होती. आजचे वास्तव म्हणजे कर्ज, व्याज, बटा, आणि खाजगी सावकाराचा दट्टा अजून चालू आहे. पण सावकारांची चड्डी पिवळी झालेली जर विठ्ठलच्या खिशात माझ्या नावाची चिठ्ठी निघाली तर! असा हे सारा बारापंच्यायती करत जगणं मात्र ते अजून संपलेलं नाही.

श्याम’ या मित्राची कथा कसेबसे शिक्षण व नोकरी. बाप सांगेल त्या पोरीशी लग्न. नोकरीपुढे मित्र तुटत नाहीत पण भेटही होत नाही. यात लेखक लिहितो “जात धर्म नसता तर स्वर्गातील देवांनासुध्दा पृथ्वीवर वास्तव्य करणाचा मोह झाला असता. मनुष्य धर्म हा सर्वश्रेष्ठ असताना इतर धर्माची आवश्यकता काय? (पृ.८६) ‘पालवी या कथेची नायिका उर्मिला नवविवाहिता. पण नवराचं माणसांत नाही. सारे दुःखी होतात. तो जांभळीच्या झाडावरून पडला. अवघड जागी मार लागला. दवाखाना चालू आहे. पुण्याला तपासून आले. बरेचं दिवस गेल्यावर तिच्या जीवनात पालवी फुटते. अशी ही अतिशय हळुवारपणे वेदना देणारी कथा. गुलमोहर या कथेतील सुधाकर एक कालेजकुमार प्रेम तुटलं म्हणून रेल्वेच्या पटीवर जीव देण्याच्या इराद्याने येतो. गेटमन त्याला अडवतो. शिक्षण कर नोकरी कर असे खुळचट विचार करून हे सुंदर जीवन संपवू नको. तू जीवनीशी

जाशील. तू विसर. या प्रेमवीराचा जीव एका गेटमनने वाचवला. मनाचा गुलमोहर अग्नी फुलांनी बहरून आला. गिर्मिट’ संघटना, चळवळी, मोर्चे, हे सारं जीवाच्या आकांताने करणारा कार्यकर्ता धर्मा. उच्चविभूषित पण या भ्रष्ट व्यवस्थेत वशिला आणि पैशाशिवाय कुठचं चिकटत नाही. धर्माचा बाप मोंढ्यात काम करतो. आईच्या डोळ्यात सुखाचे स्वप्न तर बाय‌कोच्या स्वप्नचा भुंगा झालेला. संघटनेचं राजकारण संपलं की, कार्यकर्ता भूकेकंगाल असं विदारक चित्रण या कथेचं आहे. डोक्याचं गिर्मिट नुसता धुमसत फिरण्यासाठी. धर्माचा फक्त वापर करून घेतला जातो. म्हणून आता कामा धंद्याचं पहा. अशी एक सृजनशील कथा. संचारबंदी’ आपल्या गावातील दूधवाल्या मुस्लिम पोरायला काल शहरात भोस्कलं. आता गावखेड्यातील ही मुसलमान घाबरले. कुठेतरी प्रार्थना स्थळावरुन जातीयवाद उसळला. अशा अनेक जातीय दंगलीमुळे गावातील मुस्लिम लोकं गाव सोडून जाऊ लागले. हुसेनची लेकरं गाव सोडून गेले. कथेतील अशोक म्हणतो “हुसेनमामू तुम्ही बिनधास्त राहा. भ्यायची काही गरज नाही. आणि तिकडं मळ्यात रहा. मी इथं आहे तो पर्यंत जेवन घेऊन जाईन, चला उठा! (पृ.११९) हा माणुसकीचा गहिवर अजूनही आहे. ‘झळा’ आजच्या माहेरवाशनीची कथा जावई नोकरीला लागणार हाये म्हणून जरा पेशाचं टेकन द्या.इथं रांडमुंड सासूला पैसे मागणारा जावाई. पैसे दिले नाहीतर पोरगी वागवणार नाही. अशी धमकी देणारा. पण वठणीवर आणणारी सासू या कथेत आहे. ‘पाश’ हा आजच्या काळाचा हा भंयकर विळखा म्हणजे रघू हा संस्थेत एक लाख रुपये व्याजनं काढून डोनेशन देतो. तो अंगावर राकेल टाकून जाळून घेतो. घाबरुन आप्पासाहेब त्याचे पैसे कपाटातून काढून देतो. त्याची ही विदारक कथा आहे. ‘जाणीव’या कथेत आईवडीलांना भानुदास एकुलता एक मुलगा. पुढे त्याला एक मुलगा त्याचं नाव अंकुश. बायको वारते. लोकं त्याची शेती संपत्ती पाहून दुसरं लग्न करून देतात. अंकुशला सावत्र आईचा छुपा त्रास सुरू होतो. शाळा सोडून शेळ्या वळायला पाठवणारी ही सावत्र माय. ही कोवळ्या मानाची घालमेल जाणीव या कथेतून आली आहे. बयनाम ही शिर्षक कथा अतिशय समर्पक समृद्ध आहे. या कथेतीलशांता, तिच्या नवऱ्याला पिसाळ कुत्रं डसतं. तो मरतो. शांता दोन लेकरं ‘बापू आणि मुक्ता’ यांना घेऊन धारदार निर्धाराने जगण्याचे ठरवते. मुलगा बापू भोळसर, तर लेक मुक्ता हिचं वावर विकून लग्न करते. वावर गहाणखत करुन देते. महादेव भावाने बहिणीचं शेत कोर्ट मॅटर लफड्यात खापी घातलं. पुढे भाळसर

तोतरा बापू त्याची बायको यांचे कपटी डाव ओळखते व हानुन पाडते मामाला शेत विकण्यात आडकाठी अनते ‘ज्या बहिणीने आधार दिला. सक्या भावाचा बयनामा उघडं होतो. सून निघून जाते. जा मी तुला सुखी ठेवू शकत नाही बापूंच्या डोळ्यात अश्रू हे सांगत होते. माझ्या सोबत तुझ्या आयुष्याच वाळवण करुन घेऊ नको. जणू काही हेच त्याची नजर सांगत होती ‘शेतात गेलेली शांता एक दिवस मरून पडली. मालक असलेला बापू दोन वेळच्या भाकरीसाठी मामाची खुलं राखत होता. मिसरूड फुटलेला बापू खाकी चड्डी अन् पांढरा मळकट सदरा घालून अनवाणी पायाने मामाचे गुरामागे फिरत होता” (पृ. 151) अशी ही तत्कालीन जगण्याची सखेद कथा मनाला पिळवटून टाकते. ख्यातनाम साहित्यिक उध्दव कानडे यांची पाठराखण (ब्लर्ब) “दुःखाशी संवाद संवाद हाच या कथांचा प्राण आहे. मुकी माणसं बोलू लागतात तेंव्हा लेखकाची प्रतिभा त्यांना माणूसपणाचा चेहरा प्रदान करते. खेड्यातील माणसं सुंदर बोलतात. तेव्हा भाकरीची उपेक्षेची, गरीबीची कष्टाची लढाई सांगू लागतात. फाटलेलं जीवनाचं आकाश प्रेमाच्या सुईदो-यांनी शिवतांना काळजातला जाळ पचवतात. माणसांच्या जीवंतपणाला भावपूर्णतेने समृद्ध करणाऱ्या या कथा महत्वाच्या आहेत. मराठी साहित्यात स्वतःची एक वेगळी वाट या कथांनी निर्माण केली आहे. “रवी मुकूल यांचे मुखपृष्ठ हे अतिशय सुंदर आशय संपन्न झाले आहे. आपल्या गाव शिवारात बालपण ते तरूणपण जे अस्सल अनुवभावातून आलं ते गावं माणसं त्या त्यांच्या जगण्याच्या व्यथा वेदनांचा आगडोंब त्याला चिंतन आशय तेने बा.बा. कोटंबे जी यांनी मांडले आहे.

बयनामा:-बा.बा.कोटंबे

प्रकाशकः-सुनीताराजे पवार, पुणे संस्कृती प्रकाशन, पुणे मुखपृष्ठ-रवी मुकूल किम-250/रूपतः

पुस्तक परिचयः-डॉ प्रभाकर शेळके, जालना

२९ मे २०२६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button