ममता बॅनर्जीच्या हुकूमशाही वृत्तीमुळे बंगालमध्ये त्यांचा पराभव
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे हिंदू जागरण सभेत प्रतिपादन

ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला. लोक त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले होते व म्हणूनच त्यांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेवर बसवले, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय अभ्यासक भाऊ तोरसेकर यांनी रविवारी १४ जून रोजी राममंदिर सभागृहातील हिंदू जागरण मेळाव्यात केले.

या प्रसंगी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषद महाराणा प्रताप प्रखंडचे अध्यक्ष लक्ष्मण पाटलेकर, राममंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲड मधुसूदन द्विवेदी उपस्थित होते. सभेचे आयोजन माजी भाजप नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी केले होते.
यावेळी प्रास्तविक भाषण करताना भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी निरंजन बोस यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करताना आलेले थरारक अनुभव सांगितले. भ्रष्टाचार व हिंसाचार पाचवीला पुजलेल्या पश्चिम बंगालला आता भाजपचे सुशासन लाभले ही भाजप कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सांगितले की बंगाल निवडणूक घोषित होण्याच्या साधारण दीड महिन्यापूर्वीच त्यांना निवडणूक निकालाचा अंदाज आला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या प्रकारे एसआयआर ची कडक अंमलबजावणी केली व ममतादिदींची बांगलादेशी घुसखोरांची मतपेढी नष्ट केली त्यामुळे ममतांचा पराभव नक्की होता मात्र तो एवढ्या प्रचंड प्रमाणात होईल हा अंदाज केवळ थोड्या लोकांना होता.
याचे कारण ममता बॅनर्जी यांनी गेल्या १५ वर्षांत राज्यात विकास केलाच नव्हता. त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार व बेशिस्त होती तर पक्षात घराणेशाही होती. यामुळे जनता कंटाळली होती. त्यामुळे भाजप जिंकला त्यात नवल काही नाही.
यावेळी पश्चिम बंगाल मध्ये प्रचार करण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक रवी दामले, विकास यादव, पत्रकार रवींद्र गावडे व अनेक हिंदू धर्मप्रेमी हजर होते.

अभय नवलाखे वार्ताहर. ज्येष्ठ पत्रकार महामुंबई मुक्त पत्रकार संघ