२४ तास बातम्यांचे जनक टेड टर्नर काळाच्या पडद्याआड
माध्यम जगताचा कायापालट करणारे व्यक्तिमत्त्व व दानशूर उद्योगपती

रवींद्र मधुकर शिवस्वराज्य न्यूज
२४ तास बातम्यांचा रतीब आपल्याला आता चांगलाच परीचयाचा आहे. बातम्या २४ तास दिल्या जाऊ शकतात यावर अमेरिकन लोकांचाही विश्वास नव्हता. रॉबर्ट एडवर्ड टर्नर तिसरे उर्फ टेड टर्नर या अमेरिकन उद्योगपतीने ते प्रत्यक्षात आणले व बातम्यांचे जगच बदलून टाकले. चित्रपट, नाटक, मालिका व टीव्ही शोज या व्यतिरिक्त बातम्याही मनोरंजक केल्या जाऊ शकतात याची जाणीव प्रथम झालेले हे हरहुन्नरी उद्योगपती. प्रथम उत्पादन निर्माण करायचं व नंतर त्याची गरज निर्माण करायची हे खास अमेरिकन सूत्र त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे राबवले की अन्य वृत्तवाहिन्यांना सुद्धा २४ तास बातम्या दाखवणे याशिवाय गत्यंतर उरले नाही.
तो काळ जेव्हा टर्नर यांनी पित्याचा जाहिरात फलकाचा व्यवसाय सांभाळला तो होता १९६३ सालचा टर्नर केवळ त्यावर समाधानी राहून सुखी जीवन जगू शकले असते पण त्यांनी प्रथम टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टम व नंतर सीएनएन या २४ तास बातम्या प्रसारित करणाऱ्या वृत्त वहिनीची स्थापना ८० च्या दशकात करून वेगळा मार्ग चोखाळला. सीएनएन चा अर्थ केबल न्यूज नेटवर्क. तसा केबल टीव्ही अमेरिकेत ५० च्या दशकापासून सुरू होता व ७० च्या दशकात तो अमेरिकेत घरोघरी पोहोचला.
टेड टर्नर यांनी या केबल क्रांतीत अक्षरशः हात धुवून घेतले. सुपरस्टेशन व टेलिव्हिजन नेटवर्क या संकल्पना राबवणारे ते पहिलेच. टीएनटी, टीबीएस, कार्टून नेटवर्क व टर्नर क्लासिक मुव्हीज या चार वाहिन्यांच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन v ज्ञान रंजन सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
त्यांचे प्रतिस्पर्धी व मीडिया मोगल रुपर्ट मर्डॉक हे सुद्धा टेड टर्नर यांचे मोठेपण मान्य करतात. सध्या ९५ वर्षाचे असलेले मर्डोक मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण अमेरिकेसह जगात टीव्ही वाहिन्यांच्या महाप्रचंड नेटवर्क निर्मितीसाठी ते प्रसिद्ध आहेत. छापील वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्या, मीडिया हाऊस, डिजिटल मीडिया काही विकत घेण्याचे या गृहस्थाने सोडले नाही व जगात असा एक खंड नाही जेथे या माणसाचे वृत्तपत्र अथवा टीव्ही वाहिनी नाही. ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य जसा मावळत नव्हता तसा मर्डॉक यांच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नाही. अशा माध्यम सम्राटाला आव्हान देणारे टर्नर म्हणून महत्वाचे.
मात्र केवळ माध्यम क्षेत्रात त्यांनी कमाई केली नाही तर विविध क्षेत्रात आपले नशीब आजमावले. त्यांनी अटलांटा ब्रेव्हज हा फारसा यशस्वी नसलेला अमेरिकन बेसबॉल संघ विकत घेतला व त्यांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करून पैसेही कमावले. हॉटेल उद्योगातही त्यांनी नशीब आजमावले. टेडस मोन्टाना ग्रिल ही रेस्टॉरंट साखळी त्यांनी सुरू केली.
आज त्यांच्या निधनाने एक पर्व समाप्त झाले आहे. टेड टर्नर यांना शिवस्वराज्य न्यूज तर्फे विनम्र श्रद्धांजली !