शिवस्वराज्य विचारमंच : सहकारी चळवळ अधिक व्यापक व्हावी
डॉ. महेश अनंत म्हात्रे, चेअरमन पिगी बॉक्स निधी लिमिटेड

सहकारी तत्त्वावर सुरू झालेली देवाभाऊ टॅक्सी
सहकार सप्ताह निमित्त विचारवंतांचे लेख
दिनांक २९ जून ते ६ जुलै हा सप्ताह सहकार सप्ताह म्हणून साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे जिथे सहकार चळवळीची बीजे रोवली व सहकार वृक्ष फोफावला. आज राज्यातील सहकारी कारखाने, सहकारी बँका, सहकारी दूध महासंघ, सहकारी उद्योग ही या सहकारी वृक्षाची फळे आहेत. यामुळे महाराष्ट्रासाठी सहकार सप्ताह हा अभिमान सप्ताहही आहे.
दुर्दैवाने सहकार चळवळ आज काहीशी सुस्त बनल्यासारखी वाटते याची कारणे अनेक असली तरी मुख्य चार कारणे आहेत
१ मुक्त अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाल्याने सहकार क्षेत्राला खाजगी व बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण जाते व मर्यादित सदस्य संख्या असल्याने भांडवलाच्या उभारणीस व पर्यायाने उद्योग वाढविण्यास अडचणी येतात.
२ विविध राज्यांचे विविध सहकार कायदे व नियम यामुळे एका राज्यातील सहकारी उद्योगाला दुसऱ्या राज्यात फारशा संधी निर्माण होत नाहीत.
३ कमी उत्पादने व श्रमप्रधान तंत्रज्ञान वापर यामुळे उत्पादन खर्च खाजगी क्षेत्राच्या तुलनेत जास्त असल्याने उत्पादन विक्रीवर विपरीत परिणाम.
४ व्यावसायिक व्यवस्थापन अभावामुळे व राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे सहकारी क्षेत्र प्रभावित होते.
या मुख्य समस्यांवर मात करण्यासाठी काही सूचना करावाश्या वाटतात. त्या खालीलप्रमाणे :
१ भांडवल उभारणी हा कोणत्याही उद्योगाचा कणा असतो. सदस्य संख्या वाढवून सहकारी उद्योगातील भांडवल वाढवता येऊ शकते मात्र त्यासोबतच भांडवल उभारणीचे विविध पर्याय शोधणे गरजेचे आहे. केवळ सरकारी मदतीवर व सवलतीवर अवलंबून न राहता सरकारी कर्मचारी अथवा खाजगी कर्मचारी यांच्याकडून सहकारी क्षेत्रात गुंतवणूक होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच महिला व तरुणांचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
२ साल २०२५ मध्ये भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री माननीय अमित शाह यांनी नवे सहकार धोरण लागू केले. हा अतिशय अभिनंदनीय निर्णय आहे. भारत टॅक्सी व सहकारी जीवन विमा कंपनी अशा सहकारी आस्थापनाच्या माध्यमातून वाहतूक व विमा क्षेत्रेही आता सहकारी क्षेत्रासाठी खुली झाली आहेत. मात्र त्याबरोबर सर्व राज्यांसाठी एकच सहकारी कायदा हवा. यासाठी ज्या काही कायदेशीर तरतुदी कराव्या लागतील त्या केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रितरित्या चर्चा करून त्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. याशिवाय आणखी कोणती उद्योग क्षेत्रे सहकारी तत्त्वावर चालविता येतील यासाठी अभ्यास मंडळ नेमावे.
३ उद्योगात नवे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ आणणे सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी गरजेचे आहे. ब्लॉकचेन, एआय तंत्रज्ञान, डिजीटलायझेशन याचा वापर करून उत्पादन निर्मिती व उत्पादन वैविध्य वाढविता येईल.
४ सहकारी क्षेत्र वाढवायचे असेल तर कुशल व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. व्यावसायिक व कुशल मनुष्यबळाचा वापर केल्यास खाजगी क्षेत्राच्या स्पर्धेला तोंड देता येईल. व्यवस्थापन क्षेत्रात राजकारणाच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध करायला हवा. ज्यासाठी काही कायदे करण्याची गरज आहे.
आपला नम्र
डॉ. महेश अनंत म्हात्रे
व्यवस्थापकीय संचालक
पिगी बॉक्स निधी लिमिटेड
१४, दुसरा मजला, नारायण स्मृती, छबिलदास मार्ग, आयडियल बुक डेपोच्या वर, दादर पश्चिम, मुंबई – ४०० ०२८
भ्रमणध्वनी :
+91 7738565253
Email: mayu.m253@gmail.com