शिवस्वराज्य विचारमंच : मत तुमचे, व्यासपीठ आमचे
वृत्तपत्र लेखकांच्या ताज्या घडामोडीवर प्रतिक्रिया व अभिप्राय
लॉरेन्स ऑफ इस्लामोफोबिया
पहिल्या महायुद्धाच्या सुमारास एक टी ई लॉरेन्स नावाचे गृहस्थ होते, आज मध्यपूर्वेत जो यहुदी-मुस्लिम, सुन्नी-शिया, अरब-नॉन अरब वाद सुरू आहे याचे जनक हेच लॉरेन्स महाशय होते. यांना इंग्रज लोक लाडाने ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणत.
आपल्या देशातील असेच हिंदू धर्माभिमानी लोकांचे लाडके लॉरेन्स बिष्णोई यांनी चक्क आमिर खान या उतरती कळा लागलेल्या अभिनेत्याला लव्ह जिहाद चा ब्रँड ॲम्बेसेडर ठरवून जिवे मारण्याची धमकी दिली. मुळात बिष्णोई याने खरेच अशी धमकी दिली का ते माहीत नाही. याचे कारण बिष्णोई महाशयांनी किंवा त्यांच्या टोळीच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिलेला नाही आणि जर हे खरे असेल तर या बिष्णोईस तुरुंगात राहून सर्व आधुनिक संवादाच्या सोयीसुविधा कशा मिळतात हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.
मुळात आमिर खान एक मुस्लिम धर्मीय व त्याची पत्नी गौरी स्प्रेट एक ख्रिश्चन मग कथित हिंदूरक्षक बिष्णोईच्या पोटात शुळ का उठावा बरे ? हा प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो. कथित हिंदू धर्म रक्षकाचे नाव लॉरेन्स असे ख्रिश्चन कसे हा उपप्रश्र्न ही पडू शकतो. कोणी कुणाशी विवाह करावा किंवा करू नये हे आता बिष्णोई टोळीचे सदस्य ठरवणार का ? अनेक हिंदू अभिनेत्यांनी व सेलिब्रिटीनी परधर्मीय तरुणींशी विवाह केला आहे त्यावेळी या महाशयांना लव्ह जिहाद किंवा लव्ह धर्मयुद्ध सुरू आहे असे वाटले का नाही ? थोडक्यात काय तर लॉरेन्स महाशयांना प्रचंड इस्लामोफोबिया आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक काळातील लॉरेन्स ऑफ इस्लामोफोबिया असेच म्हटले पाहिजे.
समीर पांडुरंग आगवेकर
रत्नागिरी महाराष्ट्र
