hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयटॉप न्यूजताज्या बातम्याराष्ट्रीयव्यापारशिक्षण

डॉ. चंद्रमोहन रानडे यांच्या आभा मंडळ (Aura) पुस्तकाचे प्रकाशन

मराठीतील Aura वरील या एकमेव पुस्तकाचा बोरिवली येथे प्रकाशन सोहळा संपन्न

प्रकाशन समारंभ प्रसंगी डावीकडून दिवाकर दळवी, अशोक प्रभू, डॉ.आनंद राणे, लेखक डॉ. चंद्रमोहन रानडे, व सौ. अंजली घैसास

प्रसिध्द शिक्षणतज्ञ व आभा मंडळ (Aura) विषयातील तज्ञ डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे लिखित आभा मंडळ मानवी मनाची प्रतिमा या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी बोरिवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मांगेला समाज हॉल, स्टार मॉल समोर, जॉगर्स पार्क व शिंपोली मेट्रो स्थानकाजवळ बोरिवली पश्चिम येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वैदिक विज्ञान संस्थेचे कार्यवाह डॉ.आनंद राणे, अखिल भारतीय डाऊझिंग सायन्स संस्थेचे अध्यक्ष अशोक प्रभू, सौ अंजली घैसास, संशोधक दिवाकर दळवी, शब्दश्री मासिकाचे संपादक उमेश मिटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आभा मंडळ विषयात अमेरिकेतून डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ. चंद्रमोहन रानडे यांनी या पुस्तकात आभा मंडळ म्हणजे काय ? आभा मंडळ शक्ती कशी वाढवायची ? मानसिक आरोग्य व ऊर्जेचा संबंध, सकारात्मक शक्ती कशी वाढवायची ?  अध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. रसिक वाचकांनी या प्रकाशन सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रास्तविक करताना डॉ. आनंद राणे यांनी आभा मंडळ म्हणजे काय ? त्याचा मानवी जीवन विशेषतः आरोग्याशी कसा संबंध आहे याबद्दल माहिती दिली. सौ. अंजली घैसास यांनी लेखक डॉ चंद्रमोहन रानडे यांच्याबाबत माहिती दिली. तर अशोक प्रभू यांनी मानवी शरीरातील पी एच म्हणजे आम्लता पातळीचा शारीरिक व मानसिक आरोग्याशी संबंध याबद्दल माहिती दिली.

मुख्य भाषणात डॉ. चंद्रमोहन रानडे यांनी सांगितले की आभा मंडळविषयी वेदात व भारतीय पुराणात हजारो वर्षापासून माहिती आहे. आपल्या देवी देवतांच्या मस्तकामागे जी प्रभा असते तेच आभा मंडळ मात्र मराठीत यावर एकही पुस्तक नव्हते. इंग्रजीत सुमारे दोन डझन पुस्तके असताना एकही पुस्तक मराठीत नाही यामुळे मी स्वतःच पुस्तक लिहायचे ठरवले व आज रसिकांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे.

 

डॉ. रानडे यांनी पुढे सांगितले की प्रत्येक जीवित मनुष्याच्या सभोवताली आभा मंडळ असते.  अगदी हाताची दहा बोटे जवळ धरून प्रकाशात  पाहिल्यावर एक पारदर्शक प्रकाशित थर दिसतो तेच आभा मंडळ असते मात्र ते अधिक स्पष्ट  पाहण्यासाठी अभ्यास व साधनेची गरज असते. एकदा आभा मंडळ पाहता आले की स्वतःचेच नाही तर कोणत्याही व्यक्तीचे आभा मंडळ पाहता येते. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य जाणून घेता येते. याबाबत डॉ. रानडे यांनी काही उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की ज्या व्यक्ती खरोखर सात्विक, आध्यात्मिक मार्गाच्या असतात त्यांच्या भोवताली आभा मंडळ तेजस्वी असते. एखाद्या व्यक्तीच्या आभा मंडळात काही दोष असतील तर ते ही दूर करता येतात. आभा मंडळ या पुस्तकाचे वाचन केल्यास याबाबत अधिक जाणून घेता येईल. यामुळे रसिक वाचकांनी या पुस्तकाचे वाचन करावे व आपल्या जवळच्या लोकांना हे पुस्तक भेट म्हणून अवश्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. चंद्रमोहन रानडे यांच्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आप्त, हितचिंतक, मित्र व मैत्रिणींनी  यावेळी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन डॉ. रानडे यांचे अभिनंदन केले. शब्दश्री मासिकाचे मुख्य संपादक श्री. उमेश मिटकर यांनी त्यांना त्यांनी लिहिलेले इंग्रजी भाषेतील Man who stole my paradise  हे पुस्तक भेट म्हणून दिले.

समारंभाच्या शेवटी डॉ. आनंद राणे यांनी सर्वांचे आभार मानले. अनेक वाचकांनी पुस्तक विकत घेऊन त्यावर डॉ. चंद्रमोहन रानडे यांची सही घेतली.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. चंद्रमोहन रानडे यांनी पुस्तक लिहीण्यामागील भूमिका विशद केली व पुस्तकाची माहिती दिली त्यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button