हाफकिन संस्थेचा १२७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा
मेजर डॉ. आश्लेषा तावडे - केळकर (नि.) यांच्यासहित आमंत्रित व्यक्तींची भाषणे

लसनिर्मिती व औषध निर्मिती क्षेत्रातील देशातील प्रसिद्ध संस्था हाफकिन इन्स्टिट्युटचा १२७ वा स्थापना दिन सोमवार १० ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ‘उत्तम आरोग्यासाठी विज्ञान, कल्पना व करूणा यांचा संगम ‘ या विषयावर विविध क्षेत्रातील आमंत्रित वक्त्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. हरीश पाठक होते. डॉ. हरीश पाठक हे केईएम रुग्णालयाचे डीन असून गुन्हेवैद्यक विज्ञान व विषविज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. याशिवाय प्रसिद्ध जीववैद्यकीय शास्त्रज्ञ प्रो. डॉ. भूषण पटवर्धन हे (मुख्य वक्ता), मेजर डॉ. आश्लेषा तावडे – केळकर (नि.) (आमंत्रित वक्त्या), डॉ. आदिती वैद्य ( स्थापना दिन वक्त्या ) हे प्रमुख पाहुणे समारंभाला उपस्थित होते. हाफकिन इन्स्टिट्युट संचालिका डॉ. सुवर्णा खरात व मुख्य प्रशासनिक अधिकारी महेश जगताप यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थित मान्यवरांना करून देण्यात आला. नंतर हाफकिन संस्थेमार्फत पाहुण्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यानंतर की नोट स्पीकर डॉ. भूषण पटवर्धन यांनी एकात्मिक आरोग्यसेवा – अतिरंजित कल्पना की भविष्यातील वास्तव यावर आपले विचार प्रकट केले. डॉ. आदिती वैद्य यांनी हाफकिन संस्थेची स्थापना, इतिहास व वारसा यावर उदबोधक भाषण केले. यावेळी त्यांनी संस्थेसोबत काम करताना आलेले वैयक्तिक अनुभव सांगितले.

मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे – केळकर (नि.) यांनी आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्यंत महत्वाच्या विषयावर आपले विचार उपस्थित लोकांसमोर मांडले. समारंभाच्या शेवटी हाफकिन संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे – केळकर यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सखीसह्याद्री कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहा.