बारामती पोलीस ठाण्याबाहेर तणावाची परिस्थिती
अजितदादा विमान अपघात झिरो एफआयआर बंगळुरू पोलिसांकडून बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बरोबर दोन महिन्यांनी याबद्दलचा प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे FIR बंगळूरू पोलिसांकडून बारामती पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याबद्दल स्वतः रोहित पवार माहिती घेण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यात येणार असल्याने पोलीस ठाण्याबाहेर वकिलांची मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे थोडी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
या पूर्वी रोहित पवार यांनी प्रथम मुंबई व नंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विमान अपघाताची प्राथमिक चौकशी चालू असल्याचे कारण देत महाराष्ट्राच्या पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला होता. यावर विरोधी पक्षांनी झोड उठवली होती. शेवटी असे सूत्रांकडून कळते की राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार कर्नाटक राज्यातील बेंगळुरू शहरात झीरो FIR रोहित पवार यांच्याकडून नोंदवण्यात आला. बंगळूरू पोलिसांनी भारतीय न्यायिक संहिता कलम ६१, १०३,१०५,१०६,१२५,२३८ व ३३६(२) नुसार FIR नोंदवला आहे.ही कलमे गुन्हेगारी कट, घातपाताचा प्रयत्न, पुरावा नष्ट करणे याबद्दलची आहेत.