राज्यासह देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह
मुंबईत पिकेट रोड, दादर पश्चिम व खारचे घंटेश्वर मंदिर मुख्य सोहळ्याची ठिकाणे
हनुमान जयंती आज राज्यासह देशभरात उत्साहाने साजरी होत असून, मुंबईत विविध ठिकाणी हनुमान जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काळबादेवी येथील पिकेट रोड हनुमान मंदिर फार जुने हनुमान मंदिर असून गेल्या दहा दिवसांपासून येथे हनुमान जयंतीची तयारी सुरू आहे. तसेच दादर पश्चिम येथील चौकातील हनुमान मंदिरातही हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाची रेलचेल आहे. खार येथील पश्चिमेकडील पांडुरंग सदन जवळचे घंटेश्वर हनुमान मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. तेथे राहणारे फ्रेंच भाषेचे प्राध्यापक अशोक डहाणूकर आता हयात नाहीत पण त्यांनी त्यांच्या लहानपणापासून या मंदिरात नेहमी दर शनिवारी व मंगळवारी गर्दी पाहिल्याचे आम्हाला सांगितल्याचे स्मरते. येथील शेकडो घंटा भाविकांनी मनोकामना पूर्ण झाल्यामुळे बांधल्या आहेत.
खार स्थानकाच्या अगदी जवळ या मंदिराला अवश्य भेट द्यावी. देशभरात विविध मंदिरात जयंतीच्या पूर्व रात्रीपासून तयारीला सुरुवात होते. देशातील महत्त्वाच्या हनुमान मंदीरात
उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीतील हनुमान गढी मंदिर हे दहाव्या शतकातील मंदिर प्रसिद्ध आहे तसेच वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिर ही प्राचीन मंदिर आहे.
राजस्थानातील चुरू येथील सालासर बालाजी मंदिर व दौसा येथील मेहंदीपुर बालाजी मंदिर ही दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.
गुजरातेतील सालांगपुर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर व जामनगर येथील बाल हनुमान मंदिर जयंती उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत.
हिमाचल प्रदेशातील जाखु हनुमान मंदिर वैशिष्टयपूर्ण आहे याचे कारण सिमल्यातील सर्वात उंच गिरीशिखरावर हे मंदिर आहे व येथे हनुमानाची १०८ फूट उंच मूर्ती आहे.
अशीच एक सुमारे १८ फूट उंच हनुमानाची मूर्ती तमिळनाडू येथील नमक्कल आंजनेयार हनुमान मंदिरात आहे.
या बरोबर कर्नाटकातील हंपी येथील यंत्रोधारक हनुमान मंदिर व बिहारच्या पाटणा येथील महावीर मंदिरात आज भाविकांची रीघ उसळणार आहे.
रवींद्र गावडे शिवस्वराज्य