hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

विनोबांच्या ‘भूदान चळवळी’ ची पंचाहत्तरी

१८ एप्रिल १९५१ रोजी केली होती सुरुवात

“मोघमन्नं विन्दते अप्रचेताः सत्यं ब्रवीमि वध इत्स तस्य ।
नार्यमणं पुष्यति नो सखायं केवलाघो भवति केवलादी ॥”

वेदातील भूमी सुक्त या श्लोका द्वारे सांगते की जो सर्व एकटा उपभोगत असतो तो पापच करत असतो. जर अन्न व भूमी वाटली गेली नाही तर ती वाया जाते.

ज्या देशात सुईएवढी भूमी देणार नाही अशी भूमिका घेतल्याने महाभारत घडले तेथे स्वतःहून आपली जमीन गरीब भूमिहीनांना द्यायची हे अघटीतच.

महात्मा गांधी यांचे परम शिष्य विनोबा भावे यांनी मात्र हा चमत्कार घडवला. भूदान चळवळ सुरू करून व ती सुमारे  १७ वर्षे चालवून ४८ लाख एकर जमीन मिळवून  गरीब भूमिहीन लोकांना वाटून टाकली.

खरं पाहता भूदान चळवळ एका घटनेतून सुरू झाली. आंध्र प्रदेशातील (आताचे तेलंगण ) शिवरामपल्ली येथे शंकरराव देव हे सर्व सेवा संघाचे अधिवेशन घेणार होते. तेथे विनोबांनी यावे असा आग्रह त्यांनी धरला. विनोबा तेव्हा वर्ध्यातील पवनार आश्रमात कांचनमुक्त शेतीचे प्रयोग करत होते. त्यांनी आमंत्रण स्विकारले पण रेल्वे किंवा विमानाने न जाता विनोबा पायीच निघाले. ३३९ मैल अंतर चालून जाताना कम्युनिस्ट प्रभाव असलेल्या गावातून जाताना सरकारने देऊ केलेली सुरक्षा त्यांनी नाकारली. गावातून व खेड्यांतून जाताना गावकऱ्यांशी ते कांचनमुक्त शेतीवर बोलत. सोव्हिएत रशियाच्या सामूहिक शेती प्रयोगाचा हा देशी अवतार. हवा, पाणी यांच्याप्रमाणे जमिनीवर सुद्धा सामूहिक हक्क हवा असे ते म्हणत. भूमिहीन शेतकऱ्यांना कायद्याने जमिनी देता येतील असा विश्वास विनोबांना होता. खाजगी जमिनी कोणी दान करेल यावर त्यांचाही त्या वेळी विश्वास नसावा.

हा विश्वास त्यांना नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावात मिळाला. गावात सातशे घर व सुमारे तीन हजर लोक. त्यात भूमिहीन दोन हजार. त्यातील २१९ शुद्ध मागास वर्गीय इतर मागास वर्गीय ६४३. उरलेले उच्चवर्णीय पण ते ही गरीब व शिंदीच्या व्यसनात बुडालेले. शिंदी म्हणजे ताडी.गावात शेतीयोग्य जमीन २५०० एकर पण बरीचशी उच्चवर्णीय जमीनदारांच्या मालकीची. शेतात राबेल त्यालाच मजुरी मिळायची. पैसे नाहीत तर वर्ष भरात पिकलेल्या धान्याचा विसावा हिस्सा. वर्षाला एक ब्लँकेट व दोन जोडी चपला.

विनोबा गावात गेले तेव्हा गावकऱ्यांनी जमीन नसल्याची तक्रार केली. त्यांना ८० एकर जमिनीची गरज होती. विनोबांनी सरकारकडे अर्ज करण्यास सांगितले पण खाजगी मालकीची जमीन कोणी दान करण्यास तयार आहे का ते ही विचारले. एक रामचंद्र रेड्डी नावाचा जमीनदार पुढे आला व चक्क १०० एकर स्वतःची जमीन देण्यास तयार झाला. विनोबा चकित झाले व गावकरीसुद्धा !

यातून विनोबा भावे यांना भूदान चळवळीची कल्पना सुचली असावी. केवळ एक आवाहन १०० एकर जमीन मिळवून देऊ शकते तर भूदान चळवळ राबवली तर लाखो एकर जमीन गरीब भूमीहिन लोकांना देऊ शकतो. विनोबांनी सुमारे १७ वर्षे भूदान चळवळ देशभर राबवून सुमारे ४८ लाख एकर मिळवली. ती भूमीहिन लोकांनाच मिळेल ही काळजी घेतली. जगातील ही अशा प्रकारची एकमेव चळवळ असावी. आज या चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाली असताना विनोबा भावे यांच्यासारखा कोणी ही चळवळ पुन्हा सुरू करेल का असा प्रश्न पडतो.

श्वेता रवींद्र शिव स्वराज्य न्यूज साठी


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button